Tuesday, July 15, 2008

गिल्लास आनि माळ

संत्या, दारू ओत. ओत. तुमाला म्हनुन सांगतो. हातात गिल्लास हाय आनि गळ्यात बाबांची माळ. आपन खोटं बोलत नाय. बाळ्याच्या दुकानात आपन रेशमाला पाह्यली आनि आपन बाळ्याला म्हनलं, ‘आपल्याला ही पोरगी आवडलीये. आपल्याला ही पायजे’. बाळ्या म्हनला, ‘पन अन्ना, किरट्याबी हिच्यावर लाईन मारतंय.’ आपलं टाळकंच सटकलं. हातात गिल्लास हाय आनि गळ्यात बाबांची माळ. आपन खोटं बोलत नाय. तिकडनं आपन निघालो आनि डायरेक किरट्याच्या बंगल्यावर. किरट्याच्या बापाला म्हनलं, ‘किरट्याला भाईर पाठवा.’ किरट्या आला. त्याला म्हनलं. ‘रेशमा आपली हाये. पोरीला टच करायचा नाय.’ किरट्या म्हनला, ‘पडक्या वाड्याच्या मागं भेट. तिथं तुला हानतो.’ बाळ्या, शंकऱ्या, मंगल्या समद्या पोरांना घेऊन गेलो. किरट्याबी जग्या, नाग्या, दिग्या आनि जाधवाच्या पोराला घेऊन आला. आपन म्हनलो, ‘माझी दुश्मनी तुझ्याशी हाय. पोरांना मधी आनु नको.’ किरट्या आपल्या अंगावर धावला. आपला शर्ट धरला आनि ओढला. आपल्या चुलत्यांनी दिलेला शर्ट. आपला फेव्हरेट. आपलं टाळकंच सटकलं, हातात गिल्लास हाय आनि गळ्यात बाबांची माळ. आपन खोटं बोलत नाय. आपन किरट्याच्या कनपटीखाली ठेऊन दिली. नंतर काय झालं माहित नाय. आपन जागा झालो तवा बाळ्या समोर होता. आपन म्हनलं, ‘किरट्या कुठंय’, बाळ्या म्हनला, ‘अन्ना, तुमी किरट्याला लय हानला. तेनी पळून गेला.’ मग म्हनला, ‘अन्ना, तुमी किरट्याला संपवला. रेशमाबी आता तुमचीच. तुमी शहराला जाऊन आराम करा चार दिस. शंकऱ्याची सुमो पाठवून देतो’. मी बाळ्याला म्हनलं, ‘तु बी चल.’ बाळ्या म्हनला, ‘किरट्याच्या पोरांकडं जरा बघतो. त्यांना गप केलं की गल्ली आपलीच.’ आपन शंकऱ्या, गन्या, संत्याला घेऊन शहराला गेलो. रेशमासाठी सोन्याची चैन घेतली. पोरांना दारू पाजली. किरट्याला संपवला म्हनुन गनपतीला जाऊन आलो. चार दिवसांनी गावात आलो. डायरेक रेशमाच्या घरी. तिच्या बापाला म्हनलं आपल्याला पोरगी आवडलीये. तर तो गप बसला. नंतर म्हनला, ‘पोरगी पळून गेली. तोंडात शेण घातलं माज्या.’ मी म्हनलं, ‘कोनाबरोबर’. तर म्हनला,‘किरट्या.’ आपलं टाळकंच सटकलं. हातात गिल्लास हाय आनि गळ्यात बाबांची माळ. आपन खोटं बोलत नाय. आपन किरट्याला लय शोधला पन कुटंबी भेटला नाय. त्या दिसापासून बाळ्याबी कुटं दिसला नाय. हातात गिल्लास हाय आनि गळ्यात बाबांची माळ. आपन खोटं बोलत नाय. आपन आधी दारूला टचबी केला नव्हता. त्या रात्री आपन पयल्यांदा दारू मारली. तवापासून हा गिल्लास आपल्या हातामधीच हाय. शंकऱ्या म्हनला, ‘अन्ना, किल्ल्यावर बाबा असत्यात. त्यांना भेटू’. बाबांना भेटलो. चैन त्यांच्या पायावर ठेवली आनि बाबांनी गळ्यात माळ टाकली. पन किरट्याला आपन सोडणार नाय. हातात गिल्लास हाय आनि....

Friday, June 13, 2008

विनोद

विनोद ही एकूणच आयुष्यातली फार महत्त्वाची गोष्ट आहे. केवळ जोक्स सांगणे या एका आवडीमुळे मी लहानपणी खूप मित्र जोडू शकलो याचा मला अभिमान वाटतो. मोठा झालो तसं विनोदाचं विश्व विस्तारलं. नवीन गोष्टी पाहिल्या, वाचत गेलो. एक विषय म्हणून विनोद समजून घेण्यात प्रगल्भता आली. सहज वाटलं, ज्या विनोदाने आत्तापर्यंत खूप आनंद दिलाय त्याची एक यादी तयार करावी.
एक प्रयत्न.

. मालगुडी डेज.
लहानपणी दूरदर्शनवर संपूर्ण सीरियलच पाहिली होती. आता सगळंच आठवत नाही पण मालगुडी डेज च्या १३ भागांची DVD प्रकाशित झालीये. तेवढे १३ भाग मात्र परत पाहता आले. सगळेच भाग फार सुंदर आहेत यात वादच नाही. पण जे विनोदी आहेत त्याबद्दल बोलायचंय. Cat Within, The Hoard, The Old Man of The Temple, Roman Image, A Hero, A Horse and Two Goats या सगळ्याच गोष्टी फार सुंदर आहेत. पोट धरून हसवेल असला हा विनोद नाही. गोष्ट सांगता सांगता फुलत जाणारा तो हळुवार विनोद आहे. गालातल्या गालात हसवणारा आहे आणि म्हणूनच वेगळा आहे.
मालगुडी डेज मी वाचलेलं नाहीये, पण इच्छा फार आहे. आर. के. नारायणांनी सुंदर लिहिलं असणार यात शंकाच नाही पण शंकर नाग यांनी ते तेवढंच सुंदर सादर केलंय.

२. अंदाज अपना अपना
या पिक्चरवर भरभरून बोलणारा सापडला की आम्हाला अंतरीची खूण पटते आणि समोरचा क्षणार्धात मित्र बनून जातो. आमच्या पिढीतल्या किती लोकांना या पिक्चरने वेड लावलंय गणतीच नाही. माझ्या पाहण्यात काही (दीड) शहाणे समीक्षक आलेत जे म्हणतात, ‘हा विनोद Nonsense वाटतो’. विनोदात sense शोधायला जाणाऱ्यांची मला गंमत वाटते. ‘तेजा मैं हूँ. मार्क इधर हैया वाक्यातला nonsense हाच त्यातल्या विनोदाचा सर्वांत मोठा भाग आहे. ‘लाख लाख के पचास चेक होयेंगे सर’, ‘प्लॅन ही गलत है आपका’, ‘पचास लाख क्यो मांगे पूछ’. ‘और जो मैने बोला था वो भी बोल दे’ ह्या असल्या प्रकारचे डायलॉग्ज आम्हाला वेड लावतील तरच नवल. विनोदाचं अफलातून टायमिंग,सतत एकमेकांवर कुरघोडी करण्याचा प्रयत्न (माज हा जास्त चांगला शब्द आहे), जगावेगळे डायलॉग्ज... शब्दांत बांधता येईल असला हा विनोदच नाहीये खरं तर. राजकुमार संतोषी या माणसाला सांष्टांग नमस्कार आहे माझा.
मी कधी कधी विचार करतो, या चित्रपटाचं आपल्याला एवढं आकर्षण का?
दोन गोष्टी आहेत. पहिली म्हणजे अंदाज अपना अपना च्या पूर्वी ह्या प्रकारचा विनोद आपल्याकडे झालाच नव्हता. तो Original आहे. दुसरी गोष्ट म्हणजे आमच्या रोजच्या आयुष्यात मित्रांबरोबरच्या गप्पांमधे जो विनोद आहे तो यातल्या विनोदाशी फार मिळताजुळता आहे.

. The Hitchhiker's Guide to the Galaxy.
Douglas Adams च्या सहा भागांच्या Series मधला फक्त पहिलाच भाग मी वाचलाय पण खरंच सांगतो, एका भागातच मी वेडा झालोय. Science Fiction या गोष्टीचं मला आजिबात कौतुक नाही. Adams ला सुद्धा ते कधीच नव्हतं. Science Fiction या गोष्टीचा वापर Humour म्हणून करणारा हा माणूस अचाट वाटला. काहीतरी भन्नाट कल्पना आणि भन्नाट विनोद. डोकं बाजूला ठेवून आपण नुसतं वाचत जायचं. अर्थ लावायचा मुळीच प्रयत्न करायचा नाही. सगळे भाग कधी एकदा हातावेगळे करतोय असं झालंय मला.

. Modern Times
चार्ली चॅपलिन मी काही फार पाहिलेला नाहीये पण १९३६ सालचा त्याचा हा black and white पिक्चर मात्र मी किती वेळा पाहिलाय काही गणतीच नाही. पिक्चरमधे संवाद नाहीत. चॅपलिनला नुसतं पहात रहायचं. प्रत्येक वेळी जाणवत राहतं, एक Comedian म्हणून चॅपलिन जेवढा मोठा होता तितकाच मोठा तो Actor ही होता. फार सुंदर.

५. शिरीष कणेकर
फिल्लमबाजीमुळे कणेकर फार लहानपणापासूनच माहीत होते. जरा समज येत होती तेव्हा कणेकर वाचूनही काढले. किंवा कणेकर वाचता वाचता समज येत गेली. नक्की सांगता नाही येणार. पण काहीतरी वेगळंच गवसल्यासारखं झालं होतं एवढं नक्की. कणेकरांचा विनोद प्रत्येकालाच रूचेल, झेपेल असं नाहीये. एक मात्र खरं, कणेकरांनी जेवढ्या लोकांच्या टोप्या उडवल्यात तेवढंच चांगल्या लोकांचं कौतुकही केलंय. इतरांना आवडो अगर आवडो या प्रकाराने फार मजा आणली यात वाद नाही.

६ प्रा. दीपक देशपांडे.

हास्यसम्राट वगैरे ते आत्ता झाले. लोकांना ते कितपत आवडले आवडले हा भाग वेगळा, पणहास्यसम्राट’ वगैरे प्रकाराच्या कितीतरी आधीच मी त्यांचा एकपात्री कार्यक्रम ऐकला होता. सोलापूर सोडून तेरा वर्षं झाली पण तिथल्या भाषेवरचं प्रेम आणि ओढ थोडीशीही कमी झालेली नाहीये. देशपांडेंचा कार्यक्रम ऐकून आम्ही आत्ये-मामे भावंडं एवढी खूष झालो होतो की काही विचारू नका.
******************************************************************
असो. या यादीत पु.लं.चा उल्लेख मुद्दामूनच टाळलाय. त्यांच्या विनोदाचं आयुष्यात एक फार वेगळं स्थान आहे पण त्यांच्याबद्दल वेगळं लिहावं असं माझ्याकडे काहीच नाहीये.


या यादीशिवाय आवडणाऱ्या इतर गोष्टी अनेक आहेत. ‘पडोसन’, ‘चुपके चुपके’, ‘गोलमालयांसारखे जुने चित्रपट आहेत. ‘किशोर कुमार’, ‘परेश रावल’ ‘अशोक सराफ’ ही लोकं म्हणजे विनोदाचा एक स्वतंत्र विषय होऊ शकतो. व्यंगचित्र आणि Cartoons आहेत. ‘शि.. फडणीसआहेत. ‘चिंटूआहे. ‘Xkcd’ सारखं भन्नाट Web-Comic आहे. ‘New Yorker’ आहे. नुकतंच ‘Seinfeld’ पाहायला लागलोय. आवडतंय. :)

एवढं सगळं असूनही नवीन वाचण्याची किंवा पाहण्याची इच्छा आहेच. या लिस्टवर सगळ्यात वर असलेली लोकं.
1. P.G. Wodehouse
2. Monty Python.

या गोष्टी वाचण्याचा/पाहण्याचा योग लवकरच यावा ही इच्छा.

Friday, March 14, 2008

शुद्धलेखन

दत्तू : आन्ना, म्हनुन मधला नु पैला की दुसरा?

अण्णा : म्हणून मधला 'णू' दुसरा दत्तू.

दत्तू : पन आन्ना, ब्लॉगवाले समदी पैलाच काढत्यात.

अण्णा : चुलीत घाल ते ब्लॉग तुझे. कितीदा सांगितलं पुस्तकं वाचत जा म्हणून.

दत्तू : आवो आन्ना, येवढं काय चिडताय?

अण्णा : चिडू नाहीतर काय करू? ऱ्हस्व दीर्घाच्या चुका, अनुस्वारांचा पत्ता नाही. चाललंय, जमतंय यासारख्या शब्दांवर अनुस्वार असतात हेच माहीत नाही. टाकावासाच वाटला तर चारपैकी कोणत्याही एका अक्षराला पकडून चिकटवला त्याच्या डोक्यावर. षटकोनातलाची आणि शहामृगातल्याची आलटापालट, पोटफाड्यार’ आणि ऋकारांचे चे गोंधळ. रफारांची बोंब ...गेल्या हजार वर्षांत पाहिल्या नसतील एवढ्या चुका आपल्या भाषेने गेल्या दोन वर्षांत पाहिल्यात. अरे क्रुतघ्नपणा** तरी किती कराल आपल्या भाषेशी.

दत्तू: पन आन्ना...

अण्णा : तू सांगितलेलाच एक ब्लॉग पहात होतो परवा. शुद्धलेखनाची चूक सापडली रे सापडली की माझे डोळे बंद. उघडले की परत बंद. डोळे मिटून शांत बसलो शेवटी.

दत्तू : पन आन्ना, भा. पो. झालं म्हंजे झालं ना..

अण्णा : भा. पो. ??

दत्तू: भावना पोचल्या की. भावना पोचल्या की झालं ना आन्ना.. शुधलेखन पायजेच कशाला?

अण्णा : मूर्ख आहेस. विचार तुझ्या ब्लॉगवाल्यांना, का लिहिताय म्हणावं मराठीत. भावनाच पोचवायच्या आहेत तर लिहा ना इंग्रजीत. मराठीच कशाला पाहिजे. कोण कुत्रंही वाचत नाही इंग्रजी ब्लॉग म्हणून मराठीत लिहायची हौस ना?

दत्तू : पन आन्ना..

अण्णा: विचार तुझ्या ब्लॉगवाल्यांना इंग्रजीत स्पेलिंग मिस्टेक चालतात का ते. चुकवा म्हणावं दोन-चार स्पेलिंगं तुमच्या बायोडेटात आणि पहा मिळतेय का नोकरी.

दत्तू : पन आन्ना, काय काय ब्लॉगवाले लय चांगलं लिवत्यात. नंदन दादा आहेत म्हणून आमी लंपन वाचला पयल्यांदी. नायतर काय प्रकाश नारायण संत भेटले आसते होय आमास्नी. आजून लय ब्लॉगवाले काय काय चांगलं चांगलं लिवत्यात.

अण्णा : खरंय दत्त्या. अरे वृत्तपत्रं आणि मासिकं सगळी कोणातरी नेतेमंडळी नाहीतर मोठ्या माणसांना विकली गेलेली. ब्लॉगमुळे चार चांगल्या गोष्टी लोकांना कळताहेत. मोकळेपणाने लोकं लिहिताहेत आणि तुमच्यासारखी पोरं ते वाचताहेत हे चांगलंच. पण म्हणूनच आपल्यावरची जबाबदारी वाढते. जितकं जाणीवपूर्वक आपण लिहू तेवढा आपलाच फायदा आहे.

दत्तू: आन्ना, केवढं छान बोलता तुमी. शुद्धलेखनाची सवयच करतो मी आता.
----------------------------------------------------------------
राष्ट्रीय साक्षरता अभियान द्वारा जनहित में जारी.


- या ब्लॉगवर शुद्धलेखनाच्या चुका नाहीत असा कोणताही दावा लेखक येथे करत नाही. जाणीवपूर्वक (**) केलेल्या चुका सोडून इतर चुका सापडल्यास कृपया निदर्शनास आणून द्याव्यात. आभारी आहोत.

Saturday, March 08, 2008

Ph.D.

Ph.D. ही एक पदवी आहे. ज्यांना आयुष्यात चार लोकांना उपयोगी पडेल असं काहीच करायची इच्छा नाहीये किंवा ज्यांना आयुष्यात काहीच करायची इच्छा नाहीये अशा लोकांना आयुष्यात काहीतरी करतोय असं सांगता यावं या उद्देशाने १८ व्या शतकच्या उत्तरार्धात युरोपात Ph.D.ची संकल्पना पुढे आली. Ph.D.हे Doctor of Philosophy चे संक्षिप्त रूप. ज्या गोष्टींशी सामान्य लोकांना काहीच देणं-घेणं नसतं अशा गोष्टींना Philosophy किंवा तत्त्वज्ञान असे म्हणतात. Ph.D. ची पदवी मिळवण्यासाठी अंदाजे ,,किंवा वर्षांचा कालावधी लागतो. या काळात दररोज भरपूर झोप, उरलेल्या वेळात जगातील एकूण एक चित्रपट पाहणे, फालतू विनोद करणे, अतार्किक गोष्टींवर तार्किक वाद घालणे आणि वेळ उरलाच तर तत्त्वज्ञानात डोकेफोड करणे . गोष्टींद्वारे शेवटी पदवी प्राप्त होते. अनेक सरकारी किंवा बिनसरकारी संशोधन संस्था हा आपल्यातलाच आहे’, हे कळावे म्हणून फ़क्त Ph.D. पदवीधरांचीच निवड करतात. जगातील बरेचसे लोक पैसा मिळवतात, इतर लोक Ph.D. करतात.

संशोधन
संशोधन हे केवळ अपघाताने होत असते आणि प्रामुख्याने दोन प्रकारांचे असते. पहिल्या प्रकारातील संशोधन (साधारणत: २५%) औद्योगिक क्षेत्रात कंपन्यामधे होत असते. सुटणारे प्रश्न असतात. कितीही डोकेफोड केली तरी उत्तर मिळत नसते. पण प्रश्न तर सोडवायचा असतो, कारण सगळ्याच्या मागे पैसा असतो. मग कोणीतरी गंमत म्हणून काहीतरी प्रयत्न करून पाहतं आणि अहो आश्चर्यम्! प्रश्न सुटलेला नसतो पण वेळ मारून नेता येईल असं काहीतरी सापडलं असतं. यालाच संशोधन किंवा नवीन तंत्रज्ञान असं म्हणतात. सापडलेल्या उत्तरामुळे निर्माण होणारे नवीन प्रश्न नवीन संशोधनाचा विषय होतात.
दुसऱ्या प्रकारचे संशोधन (७५ %) साधारणत: याच मार्गाने होते. फक्त त्याचा काहीच उपयोग नसतो. Ph.D.चे विद्यार्थी दुसऱ्या प्रकारचे संशोधन करतात.

प्राध्यापक.
पदवीच्या काळात प्रत्येक विद्यार्थ्यासाठी विद्यापिठातील एक प्राध्यापक असतो. सुरुवातीला महिन्यातून एकदा आणि नंतर-नंतर दोन तीन महिन्यातून एकदा प्राध्यापकाशी थोड्याफार संशोधनासंबंधी आणि बऱ्याचश्या हवापाण्याच्या गप्पा माराव्या लागतात. बरेच दिवसात भेटच झाल्याने प्राध्यापक आपल्याला विसरूनच जाण्याचा धोका असतो. त्यामुळे अधून मधून प्राध्यापकाशी -मेल द्वारे संपर्क साधून "काय कसं काय?" असं विचारण्याची पद्धत आहे. मूळ -मेल चा शोध याच गरजेतून निर्माण झाला असे समजले जाते.


प्रबंध
पदवीच्या शेवटी प्रत्येक विद्यार्थ्यास केलेल्या संशोधनाचा प्रबंध लिहावा लागतो. हा प्रबंध प्राध्यापकांच्या एका समितीसमोर मांडावा लागतो. प्रबंधामधेक्षया प्रणालीमधे स्वरूपाचा बदल केल्यास कार्यक्षमतेत % वाढ होते वगैरे गप्पा असतात. प्रबंध वाचल्यानंतर समितीतील प्राध्यापक "बरं मग???", "यात काय कौतुक आहे?", "पण क्ष ही प्रणाली आता कोणी वापरतं का?" या स्वरूपाचे प्रश्न विचारतात. या प्रश्नांची उत्तरे देता आल्यास विद्यार्थ्यास Ph.D. ची पदवी प्रदान करण्यात येते.

पैसा, आवड आणि सुख.

विद्यार्थी Ph.D. करण्याचा निर्णय घेण्यामागे प्रामुख्याने खालील कारणे असतात.
. पैसा मिळवण्यासाठी लागणाऱ्या व्यावसायिक दृष्टिकोनाचा संपूर्णपणे अभाव.
. एख्याद्या विषयात आपल्याला खूप रस आहे की काय, असे सतत वाटत राहणे.
. ’रोज सकाळी वाजता उठून नोकरीसाठी धावतोयअशी भयावह स्वप्न पडणे.

Ph.D म्हणजे नक्की काय हे वेळीच ओळखून Ph.D करण्याचा निर्णय घेणारे विद्यार्थी ही जगातील सर्वांत सुखी जमात समजली जाते.

Wednesday, January 23, 2008

चिंता करितो विश्वाची.

स्वत:मधेच इतका गुरफटत कसा गेलो हे कळलंच नाही. माझ्या रूममधल्या बेडवर आडवं पडून वरच्या छताकडे पहात काळज्या करत बसायच्या हा माझा आवडता छंद झाला होता. अभ्यासाच्या काळज्या, M.tech झाल्यावर पुढे काय याच्या काळज्या किंवा या वयात साधारणत: ज्या काळज्या आपोआप मागे लागतात त्या काळज्या. नंतर लक्षात आलं, की या प्रश्नांना उत्तरं अशी नाहीचेत. वैतागून मी ठरवलं की आता आपण वैश्विक चिंता करायच्या. थेट विश्वाच्या चिंता. पुढचे काही दिवस मी ग्लोबल वॉर्मिंग या विषयावर चिंता करायचं ठरवलंय.

एकंदरीत मूड थट्टेचा दिसतोय असं तुम्हाला वाटलं असेल. पण तसं नाहीये.

मध्यंतरी एक मित्र मला म्हणाला, "ग्लोबल वॉर्मिंगमुळे आपण मरणार रे." मला कळेचना, याला त्याची एवढी का काळजी म्हणून. पेपरातही ग्लोबल वॉर्मिंग वगैरे काही दिसलं की मी हटकून वाचायचं टाळायचो.

अगदी नुकतंच अल् गोर आणि IPCC (Intergovernmental Panel on Climate Change) यांना मिळालेल्या शांततेच्या नोबेल बद्दल ऐकलं आणि मी या विषयात लक्षं घालायचं ठरवलं. इतके दिवस अंटार्क्टिका खंडातील बर्फ वितळतोय वगैरे गप्पांशी मला काही फारसं देणं-घेणं नव्हतं. पण सहज म्हणून इंटरनेट वर फिरताना अंटार्क्टिकाचे हे फोटो पाहिले आणि मी भारावून गेलो.

त्यानंतर अल् गोर यांचा An Inconvenient Truth हा माहितीपट पाहिला आणि या सगळ्या गोष्टीचं महत्त्व लक्षात यायला लागलं. अल् गोर हा माणूस अमेरिकन असूनही तसा प्रामाणिक वाटतो. :) अगदी आवर्जून पहावा असा हा माहितीपट आहे.

गेल्या काही दिवसांपासून मराठी विकिपीडिया वर लिहावं असं मनात होतं. यानिमित्ताने ग्लोबल वॉर्मिंग किंवा जागतिक तापमानवाढीबद्दल मी थोडसं लिहिलंय. विकिपीडिया या गोष्टीचं मला कमालीचं आकर्षण आहे. ही गोष्ट खरोखरंच फार मोठी आहे. विकिपीडियावर लिहिण्याच्या निमित्ताने हा प्रकल्प नक्की चालतो कसा, हे कळलं. एक चांगली सुरूवात झाली एवढं नक्की.
आनंदाची गोष्ट म्हणजे या वेळच्या Techfest मधे IPCCचे अध्यक्ष डॉं. राजेंद्र पचौरी आणि विकिपेडियाचे निर्माते जिमी वेल्स यांची लेक्चर्स आहेत. ती आवर्जून ऐकण्याची इच्छा आहे.

सांगायचा मुद्दा हा की या वैश्विक चिंता करता करता माझा वेळ खूप चांगला जातोय. एक माणूस म्हणून आयुष्यात करण्यासारखं खूप काही आहे. स्वत:च्याच काळज्या गोंजारत बसलं की नेमका याच गोष्टीचा विसर पडतो, हे आमचे दुर्दैव.

Monday, July 09, 2007

पुन्हा एकदा

हे क्षण असेच असतात. समोर घडत असलेलं आपण सुन्न होऊन पहात असतो. दुसऱ्या कशातही लक्ष नसतं. उत्सुकता असतेच पण त्याचबरोबर अस्वस्थताही. फेडररच जिंकावा असं कितीही वाटत असलं, तरी Grass वरही नदाल आता वरचढ ठरतोय हे दिसत असतं. अचानक मॅच फेडररच्या बाजूला झुकते आणि तो जिंकतो. त्या वेळी नक्की काय वाटतं हे सांगताही येत नाही.

२००५ च्या Australian Open ची फेडरर-साफिन सेमि-फायनल आठवते. आधीच्याच मॅच मधे फेडररने अगासीला हरवल्याने माझा त्याच्यावर थोडासा रागच असतो. पण या वेळी फेडररच्या खेळाने वेड लागतं. फेडरर हरतो, पण त्यानं आपल्याला जिंकलं असतं. त्या दिवशी फेडरर आणि GOD हे शब्द माझ्यासाठी समानार्थी होतात. आता तसंच नदालच्या बाबतीतही होतं.

एक एक क्षण आठवू लागतात. ९९ च्या क्रिकेट वर्ल्डकपची ऑस्ट्रेलिया- साऊथ आफ्रिका सेमी फायनल. एका ओवर मधे आफ्रिकेला ९ रन्स हवेत. ९ विकेट गेल्यात. क्लूजनर दोन खणखणीत चौकार हाणतो. जिंकायला आता फक्त एक रन. पण तो शेवटचा रन-आऊट. मॅचनंतर पुढचे कितीतरी दिवस मला क्लूजनरला प्रत्यक्ष भेटून सांगावसं वाटतं , "बाबा रे, छान खेळलास, डोळ्यातनं पाणी काढलंस आमच्या."

२००२ ची नॅटवेस्ट फायनल. शेवटच्या १०-१२ ओवेर्स मित्राकडे पाहू असं ठरवून औंधला निघालो असताना वाटेत सेनापती बापट रोडवर आमची गाडी पंक्चर होते. काय पण वेळ. गाडी तिथेच लावून रत्ना मेमोरियल हॉस्पिटलमधे घुसून मी कुठे TV दिसतोय का ते पाहतो. एका पेशन्टच्या रूम मधे मला TV दिसतो. ओळख ना पाळख. जागेचं भान नाही. मी त्या पेशन्टच्या रूममधे शिरून उरलेली मॅच पाहतो.

क्रिकेटचं वेड पुढे खूपच कमी झालं तरी हे क्षण विसरणं कसं शक्य आहे?

२००५ च्या Formula 1 European Grand Prix चे काही शेवटचे क्षण. मॅक्लरेन चा किमी रॅकिनन सर्वात पुढे आहे पण त्याच्या गाडीच्या टायर Suspension ला प्रोब्लेम आहे. त्या टायरचे Vibrations पाहून पोटात गोळा येतोय. शेवटचा लॅप चालू होतो. फक्त एक लॅप. काही क्षणांचाच प्रश्न. पण Suspension फेल होतं आणि गाडीचं चाक निखळतं. किमीची गाडी गोल फिरत Race Track च्या बाहेर जाते. पुढचे २ दिवस मला अन्न गोड लागत नाही.

फुटबॉल वर्ल्ड कप फायनल. फ्रान्स-इटली १-१ बरोबरीत. Extra Time मधे झिदान अफलातून हेडर मारतो. बफन तेवढाच अफलातूनपणे तो वाचवतो. क्षणभर आमच्या काळजाचा ठोका चुकतो.

आयुष्याचा गाडा खडखडात करत रटाळपणे पुढे जातोय असं वाटत असतानाच हे क्षण येतात आणि तोच गाडा जोमाने ओढण्याची उर्मी देऊन जातात..पुन्हा एकदा.

Thursday, June 28, 2007

सहज.

ब्लॉग विश्वातून आता संन्यास घ्यायचा असं ठरवलं असतानाच काही दिवसांपूर्वी प्रियाने हा अविचार असल्याची आणि ब्लॉग जगतातील माझं कार्य अद्याप संपलं नसल्याची जाणीव करून दिली. :) खरंतर माझ्या अभ्यासात मी रमलोय. आपण बरे आणि आपलं काम बरं, कशाला ते ब्लॉग्ज वाचायचे आणि लिहायचे असं मी मनोमन ठरवून टाकलं होतं. आज बऱ्याच दिवसांनी Google Reader वर Sign in केल आणि नेहमीचे आवडते ब्लॉग्ज वाचायला घेतले आणि नकळत त्यात रमलो. इतर कर्मांप्रमाणे हे देखील एक कर्मच आहे आणि ते करण्यातून साक्षात माझीही सुटका नाही याची जाणीव झाली. :)

खरंतर आज माझ्या एका मैत्रिणीचं लग्न होतं. आयुष्यात पराभव तरी किती सोसायचे. इतके दिवस मित्रांच्या बहिणींची लग्न होत होती. मन घट्ट करून प्रसंगांना सामोरं गेलो. पण सख्ख्या मैत्रिणीचं लग्न म्हणजे... जाऊ दे. लग्नाच्या जेवणानंतर थोडा वेळ तरी या सगळ्याचा विसर पडावा म्हणून पिच्कर टाकायचं ठरवलं. 'तुला शिकवीन चांगलाच धडा' हा मराठी पिच्कर. पण हा पिच्कर म्हणजे हिंदी 'चुपके चुपके' ची फालतू नक्कल आहे. डोकंच फिरलं.

असो. घरी येऊन आज काय करावं या विचारात होतो. सहज म्हणून माझा इंग्रजी ब्लॉग वाचायला घेतला आणि लक्षात आलं की दोन वर्षांपूर्वी आपण पहिल्यांदा ब्लॉग लिहायला सुरुवात केली तेव्हा तिथे काहीही खरडून ठेवलंय. त्या वेळी ते मनापासून लिहिलं होतं खरं पण आता तो एक वेडेपणाच वाटतोय. गेल्या काही वर्षांकडे मागे वळून पाहिलं की असं लक्षात येतंय की प्रत्येक टप्प्यावर मला वाटायचं की आपण आता शहाणे झालो. आणि पुढे साधारण वर्षभराच्या आतच मला कळतं की आपण खरंच किती बावळट होतो. खरी अक्कल तर आता आलीये. शहाणपण गोळा करत हा प्रवास सुरू आहे. मला या निरीक्षणाची गंमत वाटते.

असो. मराठी ब्लॉगचीही तीच गंमत. काय पण दिव्य नाव ठेवलंय ब्लॉगचं. 'मॅटर म्हणे' ! डोंबल.
मला COEP मधले जवळचे मित्र मॅटर म्हणायचे. अजूनही म्हणतात. ब्लॉग लिहिण्यामागचा मूळ उद्देश मित्रांबरोबर अधिक चांगला संवाद साधता यावा हा होता. पण मराठी ब्लॉग्ज हे केवळ इतर मराठी ब्लॉगर्सच वाचतात हे मला त्यावेळी माहीत नव्हतं. मराठी ब्लॉग्ज ची "Of Marathi Bloggers, By Marathi Bloggers, For Marathi Bloggers" ही संकल्पना मी लवकरच शिकलो. :)

असो. गेले बरेच दिवस मी inactive आहे ब्लॉगविश्वात. लिहायला विषय नाहीत, सुचत नाही वगैरे रडगाणं मी गाणार नाही. खरंतर बऱ्याच गोष्टी घडताहेत आजूबाजूला. पण त्या इथे लिहून दाखवण्याचा उत्साह कमी झालाय. आधी उत्साह ओसंडून वहात होता अशातला भाग नाहीये पण महिन्यांतून एखाद-दुसरं काहीतरी लिहायचो. सध्या लिहायचा कंटाळा करतोय एवढं खरं. परत कधी मुहूर्त लागतोय ते पहायचं. हो, बऱ्याच ब्लॉग्ज वरचं बरंच काही वाचायचं राहिलंय. तेवढं काम लगोलग हाती घेतो. हेही नसे थोडके.