Friday, March 14, 2008

शुद्धलेखन

दत्तू : आन्ना, म्हनुन मधला नु पैला की दुसरा?

अण्णा : म्हणून मधला 'णू' दुसरा दत्तू.

दत्तू : पन आन्ना, ब्लॉगवाले समदी पैलाच काढत्यात.

अण्णा : चुलीत घाल ते ब्लॉग तुझे. कितीदा सांगितलं पुस्तकं वाचत जा म्हणून.

दत्तू : आवो आन्ना, येवढं काय चिडताय?

अण्णा : चिडू नाहीतर काय करू? ऱ्हस्व दीर्घाच्या चुका, अनुस्वारांचा पत्ता नाही. चाललंय, जमतंय यासारख्या शब्दांवर अनुस्वार असतात हेच माहीत नाही. टाकावासाच वाटला तर चारपैकी कोणत्याही एका अक्षराला पकडून चिकटवला त्याच्या डोक्यावर. षटकोनातलाची आणि शहामृगातल्याची आलटापालट, पोटफाड्यार’ आणि ऋकारांचे चे गोंधळ. रफारांची बोंब ...गेल्या हजार वर्षांत पाहिल्या नसतील एवढ्या चुका आपल्या भाषेने गेल्या दोन वर्षांत पाहिल्यात. अरे क्रुतघ्नपणा** तरी किती कराल आपल्या भाषेशी.

दत्तू: पन आन्ना...

अण्णा : तू सांगितलेलाच एक ब्लॉग पहात होतो परवा. शुद्धलेखनाची चूक सापडली रे सापडली की माझे डोळे बंद. उघडले की परत बंद. डोळे मिटून शांत बसलो शेवटी.

दत्तू : पन आन्ना, भा. पो. झालं म्हंजे झालं ना..

अण्णा : भा. पो. ??

दत्तू: भावना पोचल्या की. भावना पोचल्या की झालं ना आन्ना.. शुधलेखन पायजेच कशाला?

अण्णा : मूर्ख आहेस. विचार तुझ्या ब्लॉगवाल्यांना, का लिहिताय म्हणावं मराठीत. भावनाच पोचवायच्या आहेत तर लिहा ना इंग्रजीत. मराठीच कशाला पाहिजे. कोण कुत्रंही वाचत नाही इंग्रजी ब्लॉग म्हणून मराठीत लिहायची हौस ना?

दत्तू : पन आन्ना..

अण्णा: विचार तुझ्या ब्लॉगवाल्यांना इंग्रजीत स्पेलिंग मिस्टेक चालतात का ते. चुकवा म्हणावं दोन-चार स्पेलिंगं तुमच्या बायोडेटात आणि पहा मिळतेय का नोकरी.

दत्तू : पन आन्ना, काय काय ब्लॉगवाले लय चांगलं लिवत्यात. नंदन दादा आहेत म्हणून आमी लंपन वाचला पयल्यांदी. नायतर काय प्रकाश नारायण संत भेटले आसते होय आमास्नी. आजून लय ब्लॉगवाले काय काय चांगलं चांगलं लिवत्यात.

अण्णा : खरंय दत्त्या. अरे वृत्तपत्रं आणि मासिकं सगळी कोणातरी नेतेमंडळी नाहीतर मोठ्या माणसांना विकली गेलेली. ब्लॉगमुळे चार चांगल्या गोष्टी लोकांना कळताहेत. मोकळेपणाने लोकं लिहिताहेत आणि तुमच्यासारखी पोरं ते वाचताहेत हे चांगलंच. पण म्हणूनच आपल्यावरची जबाबदारी वाढते. जितकं जाणीवपूर्वक आपण लिहू तेवढा आपलाच फायदा आहे.

दत्तू: आन्ना, केवढं छान बोलता तुमी. शुद्धलेखनाची सवयच करतो मी आता.
----------------------------------------------------------------
राष्ट्रीय साक्षरता अभियान द्वारा जनहित में जारी.


- या ब्लॉगवर शुद्धलेखनाच्या चुका नाहीत असा कोणताही दावा लेखक येथे करत नाही. जाणीवपूर्वक (**) केलेल्या चुका सोडून इतर चुका सापडल्यास कृपया निदर्शनास आणून द्याव्यात. आभारी आहोत.

26 comments:

IN SEARCH OF DREAM said...

आता कोन टेशंन घेत.....किति तरि शोर्ट कट मुळे मराठी चा बट्ट्याबोळ झाला आहे..

Kaustubh said...

In Search of dream,

तुम्हाला नक्की काय म्हणायचंय ते कळलं नाही.
वाचल्याबद्दल धन्यवाद.

आजानुकर्ण said...

अण्णा पोष्टं लई आवडलं :) आमी बी जमल तितकं सुद्दं लिव्हतो.

स्नेहा said...

blog chaan aahe... mala marathitun typetaanaa.. baryach da chukaa hotata...aata dyanat theven...
ithe muddamun dev nagarit naahi lihal...

Shraddha said...

कौस्तुभ, पोस्ट पटलं. बर्‍याच इ - अनुदिनींवर हा प्रॉब्लेम जाणवतो. (माझं एक निरीक्षण म्हणजे मराठी प्रतिशब्द उपलब्ध असूनही इंग्रजी शब्द जास्त वापरणं! असो.)

बाकी तुम्ही म्हटल्याप्रमाणे ह्या शोधलेल्या चुका: :-)

टाकावसाच = टाकावासाच
लोकं = लोक

यामध्ये तुमची थट्टा करायचा हेतू नक्कीच नाही.

Kaustubh said...

श्रद्धा, योगेश, स्नेहा,
प्रतिक्रियांबद्दल धन्यवाद.

श्रद्धा,
टाकावसाच आणि टाकावासाच यात थोडा गोंधळ होतोय, पण टाकावासाच जास्त योग्य वाटतंय.चूक दुरूस्त केली आहे. ‘लोकं’ मात्र मला योग्य वाटतंय.
बोली भाषेत ‘लोक’ शब्दातील क वर जोर देऊन बोललं जातं.
असो. :)

Shraddha said...

कौस्तुभ,
बोलीभाषेतही जुन्या लोकांचे (जे योग्य उच्चार जाणतात आणि करतात!) उच्चार ऐकलेस तर ते कधीही क वर जोर देऊन बोलत नाहीत. (आता तसे लोक फारसे राहिले नाहीयेत हा वेगळा मुद्दा. असो.)

दुसरं म्हणजे लिहिताना शब्दांची प्रमाण रूपे वापरली जातात, बोलीभाषेतली नव्हे. आणि मुळातच ’लोकं’ हे बोलीभाषेतलं (घुसलेलं) रूप चुकीचं असताना ते लिखाणात वापरणे अयोग्य आहे. जमले तर याबद्दल संदर्भासहित एखादे पोस्ट टाकेन.

टाकावासाचे स्पष्टीकरण: ते मूळ "टाकावा" + "असा" चे संधी झालेले रूप आहे. टाकावासा - टाकावा असा - टाकण्याजोगा - त्याज्य. त्यामुळे टाकावासा हे बरोबर!
अजून उदा:
तिला ती गोष्ट खावीशी वाटली. (खावी अशी)

Kaustubh said...

प्रतिक्रिया देताना शुद्धलेखनाच्या चुका होतील,या दडपणाखाली बाकीचे इथे प्रतिक्रिया देण्यापासून हात आखडता घेत आहेत की काय? :P

तसं होत असेल तर या लेखाचा हेतू साध्य होत नाहीये असं मला वाटतं.
इथे काही गोष्टी नमूद करणं गरजेचं वाटतंय. इतरांप्रमाणे माझ्याही शुद्धलेखनाच्या चुका होतच असतात. मी काही या विषयातील तज्ञ नाही.
पण भाषा लिहिताना एक प्रमाण असणं गरजेचं आहे. दोन दिवसांत संपूर्ण शुद्ध मराठी लिहायला शिका असला माझा अट्टाहासही नाही. पण जाणीवपूर्वक प्रयत्न केल्यास एकमेकांच्या मदतीने हळू हळू बदल घडवून आणता येऊ शकतो इतकंच मला सांगायचे आहे.

माझ्या बरोबरचे बरेच मित्र Resource Center for Indian Language Technology Solutions, IIT Bombayशी निगडित आहेत. त्यांच्याबरोबर बऱ्याचदा चर्चा,वादविवाद होत असतात. त्यातून निघालेले काही मुद्दे आणि माझी वैयक्तिक मतं मी इथे मांडली आहेत.

श्रद्धा,
स्पष्टीकरणासाठी धन्यवाद.
एक गोष्ट सांगाविशी वाटते,की कोणत्याही भाषेचे प्रमाण तंतोतंत वापरात आणणे ही गोष्ट खूप अवघड आहे. काळानुरूप भाषेत बदल होतच असतात, शिवाय योग्य काय याबद्दलही बरेच मतभेद असतात. हे पुन्हा मी माझ्या मित्रांबरोबर होणारे वाद आणि चर्चा यांच्या अनुभवावरूनच बोलतोय. त्यामुळे अगदी १००% प्रमाण आत्मसाद करण्यापेक्षा त्याच्या शक्य तितकं जवळ जाणं मला जास्त गरजेचं वाटतं. हे माझं वैयक्तिक मत.

Nandan said...

लेखातल्या विचारांशी सहमत आहे. मला वाटतं, थोडीशी अधिक काळजी घेतली तर शुद्धलेखनातल्या बऱ्याचशा चुका टाळणे शक्य आहे. गमभनचा किंवा मनोगतचा शुद्धिचिकित्सक याकामी बराच उपयुक्त ठरावा.

[अवांतर - तुला लंपन माझ्या अनुदिनीवर प्रथम सापडला हे वाचून संतोष जाहला :)]

शमा said...

ज्या भाषेत आपण लिहितो ती भाषा अत्यंत शुद्ध आणि अचूक असावी हा आग्रह योग्यच आहे विशेषत: ती जेव्हां आपली मातृभाषा असते; पण प्रमाण भाषा, बोली भाषा किंवा शुद्धलेखनाचे काटेकोर नियम ह्यांचे अतिरेकी निकष सुद्धा ब्लॉगलेखनाच्या बाबतीत लावणे बरोबर नाही. खूप जणांची शाळेत असताना मराठी दुय्यम भाषा असल्याने भाषेच्या व्याकरणाकडे दुर्लक्ष झाल्याची शक्यता असते. र्‍हस्व दीर्घ किंवा अनुस्वार नक्की कुठे अशा साध्या साध्या बाबतींतही चुका होतात हे खरे आहे.माझ्याही होतात. ते क्षम्य नाहीच.पण आपण लिहितोय ते चुक की बरोबर ह्या धसक्यांत लिखाणच थांबवण्यापेक्षा लिहित रहाणे महत्वाचे असं निदान मला तरी वाटतं. आधीच मराठी पासून दुरावलेत अशी ओरड तरुण मुलामुलींच्या बाबतीत होत असते त्यांत परत अचूक लिहा असे अतिरेकी दडपण आणले तर जितके लिहिताहेत तितकेही लिहिणार नाहीत. अर्थात कधीकधी काही चुका इतक्या खटकतात की वाचतांना रसभंगच होतो. योग्य शब्द कोणता हे तपासून बघण्याची सोय कुठे उपलब्ध असेल ऑनलाईन तर बरेचजणं ती नक्कीच वापरतील. मी सुद्धा वापरीनच अर्थात. इंग्रजीमधे लिहिताना स्पेलचेकची सोय असते त्यामुळे बर्‍याचशा चुका टाळल्या जातात तेव्हां इंग्रजीत कसे बरोबर लिहिता ह्यां म्हणण्यात अर्थ नाही.

आजानुकर्ण said...

अतिरेकी निकष म्हणजे काय? मराठी शुद्धलेखनाचे कोणते निकष अतिरेकी आहेत? http://www.manogat.com/node/6774 इथे बहुतेक सर्व नियम पाहता येतील. त्यातला एकही निकष अतिरेकी वाटला नाही. शिवाय मनोगत संकेतस्थळाने शुद्धलेखन चिकित्सेची सोयही दिली आहे.

शमा said...

शुद्धलेखनाचे निकष लावण्यांत अतिरेकीपणा करु नका असा माझ्या म्हणण्याचा अर्थ मला अभिप्रेत आहे. अनुस्वार अमुकच ठिकाणी, बोली भाषा की प्रमाण भाषा ह्यांचा किस करणे ह्याचा अतिरेकीपणा करु नका.
व्याकरणाची काटेकोर माहिती किंवा लेखनाच्या शुद्धतेच्या नियमांची माहिती बहुसंख्यांना नसते. साहित्यजगतातले मोठमोठे लेखक लेखिकाही ह्याला अपवाद नाहीयेत. प्रुफ़रिडींगची सुविधा ह्याच कारणास्तव वर्तमनापत्रे आणि प्रकाशकांकडे असते. तेव्हां शुद्धलेखनामधेच लिहिले जावे हे म्हणणे अतिशय योग्य असले, त्यासंदर्भातील हे पोस्टही योग्य असले तरी नियमांचा काटेकोरपणा नवजात ब्लॉगर्सच्या लिखाणाला लावणे मला पटत नाही. असं करुन ते नाऊमेदच जास्त होतील.
मनोगत साईटवर शुद्धलेखन तपासून घेण्याची सोय आहे ह्या माहितीबद्दल धन्यवाद.

शमा said...

खरंतर कौस्तुभ आत्ता तुझं पोस्ट परत वाचलं तेव्हां लक्षात आलं की तु सुद्धा अतिरेकी वगैरे आग्रह धरत नाही आहेस >> "पण म्हणूनच आपल्यावरची जबाबदारी वाढते. जितकं जाणीवपूर्वक आपण लिहू तेवढा आपलाच फायदा आहे." ही तुझी अपेक्षा खूपच समजुतदारपणाची आहे. तेव्हां माझ्या प्रतिक्रियेकडे दुर्लक्ष कर.

Kaustubh said...

शमा,
हरकत नाही. इथे वरच माझ्या स्वत:च्याच प्रतिक्रियेत मला नक्की काय म्हणायचंय ते मी सविस्तर लिहिलेलंच आहे.
असो. प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद.

योगेश,
या उपयुक्त आणि महत्त्वाच्या माहितीबद्दल धन्यवाद.

Anonymous said...

@ Shraddha:

बर्‍याच इ - अनुदिनींवर हा "प्रॉब्लेम" जाणवतो. (माझं एक निरीक्षण म्हणजे मराठी प्रतिशब्द उपलब्ध असूनही इंग्रजी शब्द जास्त वापरणं! असो.)

:D

Just an observation. No offense meant, ofcourse! :)

Shraddha said...

ऍनॉनिमस,
खरं आहे. चूक झाली खरी. :-)
लक्षात ठेवायला हवं. निदर्शनास आणून दिल्याबद्दल धन्यवाद.

असो.

Shrikant Joshi said...

Baap re! :)

Waachun khush zhalo, rao!

prashna ekach. challay, jamtay hee boli-bhasha zhaali nhava? mang boli-bhashetli shabda tumhi jar lekhi bhaashet utravu laaglaat tar aamhi paamaranni kaay karaycha?? :D

maskari maaf asaavi. sandeep ani salil chya kaahi kavita maayajaalawar shodhat shodhat ithe yeun adklo - aksharshaha adaklo. :)

tuzhe vichaar waachun baraach aanand anubhavtoy, ani maajhya RSS Feed Reader madhye taaktoy.

Vicharstrot vaahat raaho, hi sadicchha!

Cheers!
Shrikant

Anonymous said...

layi bhari re!!
ek help kar na - ekhadi changli site vagere sang na jithe marathi madhe lihita yeta... me google cha hindi option waprun pahila pan tyaat barech shabd nahiyet marathi... tumhi loka kasa kaay lihita, mala kalat nahi yaar... kahitari secret ahey ka navkhyana mahit naslela??

Abhishek

xetropulsar said...

मॅटर. . .तुझ्या ह्या पोस्टला अनुसरून मी एक साधी युक्ती लिहिलीये इथे. . .ह्या विषयावर लिहिलेलं पाहून बरं वाटलं. .

http://nefrocot.blogspot.com/2008/04/blog-post.html

सुशान्त said...

हं. हा लेख आवडला. नेटक्या लेखनाचा आग्रह धरणारे तरुण पिढीत आपण एकटेच नाही ही गोष्ट सुखावणारी वाटली. मराठी शुद्ध लेखनाचे नवे सुधारित नियम येऊ घातलेत
लोकसत्तेतला
http://www.loksatta.com/daily/20080427/sun05.htm
हा लेख पाहा. ह्या नियमांवरही अनुदिन्यांवर चर्चा झडायला हवी.

Saee said...

LOL
really funny. :)
I really want to write in Marathi too but I get impatient with the softwares and I sometimes I am complete Dattu when I am confused myself to start with.
Very nice blog. :)
Cheers
Saee

Anonymous said...

matter,

baryach diwasanni tuza blog wachla. ha shuddhalekhanabaddalcha blog changlach wathlay !

ek shanka : khali "loka" ya shabdawareel anuswarawar charcha jhaleli wachli. mala je athawtay tyawarun marathi shuddhalekhanachya niyamapramaNe kontyach shabdachya shewati anuswar dyayachi garaj nahi. yache mooL karaN ase ki anuswarachya purNa uccharasathi yogya anunasik mahiti asawe lagte aNi te kewaL anuswar dilelya aksharachya pudhil wyanjanawarun tharwta yete. jevva anuswar shabdachya shewti yeto tevva he karNe shakya naste wa tya anuswaracha aghatdarshak mhaNje "jor deNyasathi" wapar kela jato. "patla", "kaLala", "watatay", "loka" ya shabdanwar boltana jari apaN "jor" det asalo tari lihitana to aghat dakhawat naheet.
tula kuthe authentic niyam miLale tar nakki sang paN mazya mate me ha niyam marathi wyakraNachya pustakat (bahuda Mo. Ra. WaLimbe) wachlyache andhukse smarate ahe !

mazya mate baryach shuddhalekhanatlya chuka "indic typing" muLe hotat. Kagad pen gheun lihayala shuddha lihiNyachi saway aste hatala. "indic" typing kartana shuddhatepeksha wichar pohochawNyala lok jasta mahatwa det asawet.

-Pranav Karve

Anonymous said...

magachi "comment" apurNa watli mhaNun hee purawNi jodato ahe.

wishay toch, anuswaracha.

"खरंय दत्त्या. अरे वृत्तपत्रं आणि मासिकं" = "khara ahe dattya. are wruttapatre aNi masike"

he ekaranta shadba "lekhi" watle aNi te lihilyamuLe lekhantla "aaplepaNa" thoda kami zala tari, shuddhalekhanachya niyamapramaNe te ekarant shabdach yogya ahet.

"khara ahe" ase jari lihilele asle tari te wachtana "खरंय" ase wachle tari (bolibhashet) chook dharat nahit.

paN wyakraNachya niyamapramaNe "खरंय" ase lihile asel tar tyacha ucchar "kharawny" asa hoil.

(ya, ra, la, wa, sha, shha, ha, La, kha, dnya ya gatache anunasik mhaNun "wa" wapartat. uda."siwnha", "swayawnwar" etyadi.)

- Pranav Karve

Aditi Rajhans said...

Bhari lihilay !! Mastach !

Aditi Rajhans said...

Marathit type karNyasathi Baraha navacha software best ahe, nidaan mi tari tech vaaparte.. Atta open kela nahiye mhaNun english lipi ani marathi bhasha ashya hybrid madhe lihit ahe.. Baraha free download karta yete baraha.com varun. Kivva google trasnliterate pan vaparta yete..

Kaustubh said...

लई छाण!!

"आमचे चंदण णगर लई छाण, करू नका कुनी हीतं घान " - असा एक 'भिंती वरचा संदेश' आठवला...

चुकुनसुद्धा कधी सगळे शब्द बरोबर लिहिलेत असे होत नाही...

"पन तुमी काय बी म्हना XXX सर, पुन्याचं पानी ते पुन्याचं पानी "...इति आमचे ईंजिनिअरिंगचे एक मास्तर...

पण ह्याच भाषेला 'ग्रामीण बोली' असे नाव देऊन आपल्या 'नागर बोली' शेजारी अधिकृतपणे बसवले की प्रश्नच मिटला!

२००० पर्यंतच्या बेकायदा झोपड्या 'अधिकृत' होऊ शकतात...मग ही भाषा/ बोली अधिकृत करणे कितिसे अवघड आहे?

असो...